ठळक घडामोडी

कुडाळात रस्त्यांवर मोकाट गुरांचा पुन्हा ठिय्या; वाहनधारकांची कसरत!

बसस्थानक ते पोस्ट ऑफिस चौकात गुरांचा कळप; वाहतुकीला अडथळा

गुरे पकड मोहीम बारगळली?; अपघाताचा धोका वाढला

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला असून मुख्य रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या गुरांच्या कळपामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. आजही बसस्थानक ते पोस्ट ऑफिस चौकादरम्यान या गुरांचा कळप कुठे ठाण मांडून, तर कुठे थेट रस्ता अडवत चालताना दिसून आला. लहान वासरे अचानक रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे.
       कळपातील काही जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी राहतात, तर काही थेट रस्त्यावर बसून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. विशेष म्हणजे या कळपात लहान वासरांचाही समावेश असल्याने ती अचानक रस्त्यावर धावत येतात. त्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावणे अथवा वाहने वळविणे भाग पडत आहे. यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
      दिवस असो वा रात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांवर या जनावरांचा मुक्त संचार सुरू असल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडत आहे. दुचाकी व चारचाकी चालकांना गुरांच्या कळपातून मार्ग काढत पुढे जावे लागत आहे. तर बस, ट्रक आणि इतर मोठ्या वाहनांना जनावरे बाजूला जाईपर्यंत थांबावे लागत असल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे.
      काही दिवसांपूर्वी नगरपंचायतीने सुरू केलेली मोकाट गुरे पकड मोहीम आता थंडावल्याने पुन्हा गुरांचा मुक्त संचार सुरू झाला आहे. यामुळे वाहनधारक, पादचारी, शालेय विद्यार्थी तसेच भाजी विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता नगरपंचायतीने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

error: Content is protected !!