
आवळेगाव येथे कृषिकन्यांचा उपक्रम
कुडाळ : छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, किर्लोस-ओरोस येथील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) आवळेगाव येथे कृषी निविष्ठा विक्रेत्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्ष भेटीचे आयोजन केले.
या अंतर्गत कृषिकन्या सृष्टी बोले, किर्ती गुरव, सायली धुरी, विशाखा सूर्याजी आणि दुर्गा मोडक यांनी कडावल येथील सारा अॅग्रोटेक आणि सह्याद्री कृषी सेवा केंद्र येथे भेट दिली. यावेळी बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके व इतर कृषी निविष्ठांची उपलब्धता, साठवणूक आणि विक्री याबाबत माहिती घेण्यात आली.
कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना पिकाच्या गरजेनुसार योग्य निविष्ठांची निवड, वापराचे प्रमाण, रसायनांच्या वापरातील काळजी आणि उत्पादनांच्या योग्य वापराबाबत दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाचा अभ्यास करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यामध्ये विक्रेत्याची भूमिका जाणून घेण्यात आली.
या प्रत्यक्ष भेटीमुळे कृषिकन्यांना कृषी निविष्ठा विक्री व्यवसायाची तसेच शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेता यांच्यातील संबंधाची प्रत्यक्ष माहिती मिळाली. सैद्धांतिक ज्ञानाला व्यावहारिक अनुभवाची जोड मिळाल्याने हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी ज्ञानवर्धक व उपयुक्त ठरला.










