
वजनकाट्या समोरील वळणावर भीषण अपघात
कुडाळ पोलिसांसह अग्निशमन दलाचे मदतकार्य
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ एमआयडीसीतील महानंदा पशुखाद्य कारखाना (वजन काटा) समोरील धोकादायक वळणावर सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात मिक्सर ट्रक चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आज सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधून मिक्सर वाहन कुडाळच्या दिशेने येत होते. महानंदा पशुखाद्य कारखान्या नजिक वजन काट्यासमोरील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मिक्सर ट्रक रस्त्यालगत पलटी झाला. या दुर्घटनेत चालक केबिनमध्ये अडकून पडला.
अपघातात गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांसह अग्निशमन प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.याबाबत पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.










