ठळक घडामोडी

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कवठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

कवठी युवक मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय करलकर यांचा पुढाकार

जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वितरण

कुडाळ : प्रतिनिधी
        ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळ (मुंबई)चे अध्यक्ष संजय करलकर यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद कवठी शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळा प्रशासन, शिक्षक व पालकांनी स्वागत केले.
     या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
     यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण केले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाची कास धरून ज्ञानसंपादन करावे आणि भविष्यात देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
     कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय करलकर आणि रुपेश पावसकर यांच्या विशेष पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक व पालकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी व्यासपीठावर कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय करलकर, लाजरी ग्रुप कुडाळचे अध्यक्ष राजू पाटणकर, पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, सरपंच स्वाती करलकर, उपसरपंच रुपेश वाड्येकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनिष वाड्येकर, उपाध्यक्ष जोशी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश बांदेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!