
सात-आठ गव्यांच्या कळपाकडून शेतकऱ्यांच्या भातशेतीसह चिबूड पिकाचे नुकसान
गव्यांच्या उपद्रवाने शेतकरी भयभीत; पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाईची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून, शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले आहेत. सध्या या परिसरात सात ते आठ गव्यांचा कळप दिवसाढवळ्याही नागरिकांच्या निदर्शनास येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात शेतकरी सुभाष तेंडोलकर यांनी सुमारे दीड एकर क्षेत्रात मोठ्या मेहनतीने भातशेती केली आहे. मात्र, बुधवारी रात्री सात ते आठ गव्यांच्या कळपाने त्यांच्या शेतात घुसून भातपीक खाऊन तसेच तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे.
याच परिसरातील चिबूड उत्पादक नंदकिशोर सर्वेकर व संदीप वारंग यांच्या चिबूड पिकाचेही गव्यांनी नुकसान केले आहे. गव्यांचा कळप वारंवार शेतांमध्ये घुसत असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करणे कठीण झाले आहे.
दोन वर्षांपासून गव्यांचा वावर!
गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून गव्यांचा कळप वावरत आहे. सुरुवातीला गव्यांची संख्या कमी होती; मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या गव्यांचा कळप परिसरात फिरताना दिसत असल्याने शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
सुभाष तेंडोलकर व त्यांच्या कुटुंबीयांनी काबाडकष्ट करून भातशेती उभी केली होती. मात्र, एका रात्रीत गव्यांच्या कळपाने केलेल्या नासधुसीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. “मोठ्या मेहनतीने शेती करायची आणि वन्यप्राण्यांनी एका रात्रीत पीक उद्ध्वस्त करायचे, तर आम्ही शेती करायची तरी कशी?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाईची मागणी!
गव्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणताही ठोस पर्याय उरलेला नाही. त्यामुळे वनविभागाने या परिसरातील गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी सुभाष तेंडोलकर यांनी केली आहे.










