ठळक घडामोडी

आंबेडकरनगर, कविलकाटे व दत्तनगर रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक!

नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ सा.बां.विभागावर धडक

सात दिवसांत खड्डे न बुजवल्यास ‘रस्ता रोको’चा दिला इशारा

कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ-बाव या मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR 27) वरील विशेषतः आंबेडकर नगर आणि कविलकाटे तसेच दत्तनगर रोड परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. येत्या सात दिवसांत प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून वाहतूक सुरक्षित करावी, अन्यथा ‘थेट खड्ड्यात बसून आणि रस्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा कुडाळ शहर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.
        गणेश चतुर्थी हा सण देखील काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे रेल्वेने येणाऱ्या लोकांची देखील संख्या वाढल्याने सदर रस्त्यावर वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी स्थानिक नागरिक आणि ठाकरे शिवसेना शिष्टमंडळाने कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागाचे  उपअभियंता धीरजकुमार पिसाळ यांची भेट घेतली व त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
      आंबेडकर नगर, कविलकाटे आणि  दत्तनगर रोड परिसरात रस्त्यावर प्रचंड मोठे आणि खोल खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, ज्यामुळे येथे रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. दुचाकीस्वार, शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत क्लेशदायक व धोकादायक बनले आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
      ७ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा तीव्र आंदोलन
     “रस्त्यावरील या जीवघेण्या खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला संपूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग जबाबदार असेल,” असा इशारा शिष्टमंडळाने दिला. हे खड्डे पुढील ७ दिवसाआत दर्जेदार पद्धतीने बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या मुदतीत प्रशासनाने कारवाई न केल्यास कायदा व सुव्यवस्थेची पर्वा न करता तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.यावेळी उपजिल्हप्रमुख अमर सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, नगरसेवक मंदार शिरसाट नगरसेवक संतोष शिरसाट,सुशील चिंदरकर, नितीन सावंत,बाळा पावसकर,अमित राणे,भूषण कुडाळकर, गुरु गडकर, संजय मसुरकर,धीरेंद्र चव्हाण, शाखा अभियंता श्री. बामणे तसेच आंबेडकर नगर व कविलकट्टा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!