ठळक घडामोडी

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील बाजारपेठा सजल्या!

राख्यांच्या स्टॉल्सनी बाजारपेठांना आली उत्सवी रंगत

लहान मुलांसाठी नव्या ट्रेंडच्या राख्यांना पसंती

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
        रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी, देवगड, मालवण, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांतील शहरी तसेच ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये राख्यांच्या खरेदीसाठी लगबग वाढली आहे.
         यावर्षी शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होत असून, हा सण बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचे आणि जिव्हाळ्याच्या नात्याचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याच्या मनगटावर प्रेमाची आणि विश्वासाची राखी बांधते. भाऊही बहिणीला तिच्या संरक्षणाचे व सदैव सोबत राहण्याचे आश्वासन देत रक्षाबंधनाचा हा सण उत्साहात साजरा करतो. या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमधील दुकानांमध्ये राख्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला आकर्षक राख्यांचे स्टॉल उभारण्यात आले असून, विविध रंग, आकार आणि डिझाईनच्या शेकडो प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पारंपरिक राख्यांसोबतच आकर्षक डिझाईन, कार्टून कॅरेक्टर, विविध आकारांच्या तसेच आधुनिक ट्रेंडमधील राख्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
      विशेषतः लहान मुलांसाठी विविध कार्टून आणि आकर्षक डिझाईनच्या राख्या बाजारात दाखल झाल्या असून, या राख्यांकडे बालचमुंचे विशेष लक्ष वेधले जात आहे. भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनासाठी बहिणींकडून भावांसाठी आवडीची राखी निवडण्याची लगबग सुरू झाली आहे. परगावी असलेल्या भाऊरायाला बहीणी रक्षाबंधनच्या अगोरदच पोस्टाद्वारे तसेच कुरिअरद्वारे राखी पाठवितात. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासूनच महिला भगिनींची राख्या खरेदीसाठी लगबग वाढली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि राख्यांच्या स्टॉल्समुळे जिल्ह्यातील बाजारपेठांना सणासुदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

error: Content is protected !!