
सिंधुदुर्गातील १३ पोलीस अधिकारी-अंमलदारांचा गौरव
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. आज स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरी येथील कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर यांचा सन्मान करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील तेरा अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ.मोहन दहिकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये कुडाळ पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांचा देखील समावेश आहे. पोलीस महासंचालकांकडून हि निवड जाहीर करण्यात आली असून आज स्वातंत्र्यदिनी या सर्व अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान करण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत, पोलीस अधिक्षक मोहन दहीकर, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.










