
लाखोंचा मुद्देमाल जप्त; संशयित चौकशीसाठी ताब्यात
पणदूर परिसरात खळबळ; पोलिसांकडून वेगाने तपास सुरू
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने शनिवारी सायंकाळी उशिरा मोठी कारवाई करत व्हेल माशाच्या उलटीच्या (अंबरग्रीस) कथित तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत लाखो रुपये किमतीचा संशयित मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन ते चार संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. यामध्ये जिल्ह्यातील संशयितांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पणदूर परिसरात एलसीबीकडून कारवाई करण्यात आली असून, कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखलची कार्यवाही सुरू असल्याची माहीती पोलीसांकडून देण्यात आली.
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने पणदूर तिठा परिसरात सापळा रचून संशयितांवर कारवाई केली. यावेळी तस्करीसाठी वापरलेली एक कार व दुचाकी अशी दोन वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. कारवाईनंतर जप्त मुद्देमाल व ताब्यात घेतलेल्या संशयितांना घेऊन एलसीबीचे पथक पुढील कार्यवाहीसाठी कुडाळ पोलीस ठाण्यात रवाना झाले. कुडाळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. एलसीबीनेही याला दुजोरा दिला. दरम्यान, पणदूर तिठ्यावर एलसीबीने केलेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची नेमकी किंमत, वजन तसेच तस्करीमागील संपूर्ण साखळीबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.










