
महायुती सरकारसह पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार
कुडाळ : प्रतिनिधी
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि पुढाकाराला यश आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी करारावर स्वाक्षऱ्या झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुका भाजपा युवा मोर्चाच्यावतीने आज कुडाळ येथे घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला या प्रकल्पामुळे नवी चालना मिळणार आहे. तसेच स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख मिळवून दिली. त्याच दिशेने महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटन व रोजगाराला चालना देणारे प्रकल्प येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महायुती सरकारचे आणि विशेषतः सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे कुडाळ भाजप युवा मोर्चाच्या वतीने आभार मानण्यात आले. जिल्ह्यातील युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री नितेश राणे प्रयत्नशील असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, युवा मोर्चा कुडाळ मंडल अध्यक्ष तन्मय वालावलकर, ओरोस मंडल अध्यक्ष शुभम परब, युवा मोर्चा कुडाळ मंडल उपाध्यक्ष वैभव पवार, अॅड.रजत चव्हाण, लक्ष्मीकांत राणे, जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, ओंकार म्हात्रे, व्यंकटेश परब, अक्षय तेंडुलकर, कुडाळ शहर अध्यक्ष सुनील बांदेकर, विजय कांबळी, तेंडोली जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील आदी उपस्थित होते.










