ठळक घडामोडी

स्वातंत्र्यदिनाचा अभिमान आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान; अणाव ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद पायंडा!

कुडाळ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अणाव ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण आणि अभिमानास्पद वातावरणात पार पडला. यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ कर्मचारी श्री. संतोष अणावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
      प्रदीर्घ सेवेनंतर येत्या काही महिन्यांत निवृत्त होणाऱ्या ज्येष्ठ कर्मचाऱ्याला ध्वजारोहणाचा मान देऊन त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. लिलाधर अणावकर यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थित ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. अनेक वर्षे गावाच्या सेवेसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हस्ते तिरंगा फडकवून त्यांचा गौरव करणे, हा त्यांच्या सेवेला दिलेला मानाचा मुजरा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आजच्या काळात पद आणि अधिकारापेक्षा सेवा व योगदानाला महत्त्व देत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम निश्चितच आदर्शवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भविष्यात ग्रामपंचायतीतील ज्येष्ठ कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच गावाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींनाही अशा प्रकारे सन्मान देण्याची परंपरा पुढे जावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ध्वजारोहण कार्यक्रमाला सरपंच श्री. लिलाधर अणावकर, उपसरपंच सौ. आदिती अणावकर, पोलीस पाटील श्री. सुनील पाटकर, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष श्री. विनायक अणावकर, तलाठी सौ. वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, शासकीय कर्मचारी, वाचनालयाचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी, निवृत्त फौजी व माजी सैनिक, माजी सरपंच, माजी उपसरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
     दरम्यान, ध्वजारोहण कार्यक्रमानंतर आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ते आरोग्य केंद्र अशी आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात आली. निरोगी आणि जागरूक नागरिक हेच देशाच्या विकासाचे खरे बळ असल्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
ज्येष्ठ कर्मचारी श्री. संतोष अणावकर यांच्या हस्ते फडकलेला तिरंगा हा केवळ स्वातंत्र्याचा ध्वज नव्हता, तर त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रामाणिक सेवेला आणि गावाशी असलेल्या नात्याला दिलेला सन्मान होता. सरपंच श्री. लिलाधर अणावकर यांच्या या संवेदनशील आणि कौतुकास्पद निर्णयामुळे अणाव ग्रामपंचायतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘पदापेक्षा सेवा मोठी आणि अधिकारापेक्षा सन्मान मोठा’ हा संदेश दिला आहे.

error: Content is protected !!