
कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमांतर्गत हुमरमळा (अणाव) येथील शाळेत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
रंगभरण स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन व देशभक्तीपर विषयांवरील चित्रे देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत चित्रांमध्ये आकर्षक रंग भरले. तसेच हस्ताक्षर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर, सुवाच्य व नीटनेटके अक्षर सादर केले.
या स्पर्धांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सर्जनशीलता, कलागुण आणि सुंदर हस्ताक्षराची आवड निर्माण करणे हा होता. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
या उपक्रमाचे आयोजन RAWE विद्यार्थिनी हर्षदा साबळे, आकांक्षा जाधव, संजीवनी पाटील आणि श्रावणी बाचल यांनी केले. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभल्यामुळे दोन्ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या.










