
आयोडीनयुक्त मिठाच्या वापराबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
‘आयोडीनयुक्त मीठ वापरा, आयोडीन न्यूनता विकार टाळा’; कार्यशाळेत जनजागृती
कुडाळ : राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती, कुडाळ येथील सभागृहात करण्यात आले.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. स्वप्नील मालखेडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर येथील डॉ. भोई, तालुका आरोग्य अधिकारी, मालवण डॉ. सुधीर धनगे तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल वाघ यांच्या उपस्थितीत झाले.
या प्रशिक्षणास जिल्ह्यातील 30 गावांतील आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये आयोडीन न्यूनता विकार, त्यांचे प्रतिबंध व नियंत्रण, आयोडीनयुक्त मिठाचे महत्त्व, मिठातील आयोडीनचे प्रमाण तपासणी, Salt Iodine Test Kit चा वापर, गलगंड सर्वेक्षण तसेच Urinary Iodine Estimation याबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.
आयोडीन हे शरीरातील थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक सूक्ष्म पोषक घटक असून आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंडासह विविध आयोडीन न्यूनता विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आयोडीनयुक्त मिठाचा नियमित वापर करणे महत्त्वाचे आहे.
कार्यशाळेत घरगुती स्तरावर तसेच उत्पादक व विक्री केंद्रांवर मिठातील आयोडीनचे प्रमाण तपासणे, आयोडीनयुक्त मिठाची गुणवत्ता कायम राखणे आणि त्याबाबत जनजागृती करण्याच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मिठातील आयोडीनचे प्रमाण टिकून राहण्यासाठी त्याची योग्य साठवणूक करण्याचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर नागरिकांमध्ये आयोडीनयुक्त मिठाच्या वापराबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना आयोडीन न्यूनता विकारांचे सर्वेक्षण, प्रतिबंध, नियंत्रण, मिठातील आयोडीन तपासणी आणि जनजागृती याबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळाले. “आयोडीनयुक्त मीठ वापरा – आयोडीन न्यूनता विकार टाळा” हा संदेश कार्यशाळेतून देण्यात आला.










