ठळक घडामोडी

महिला बचत गटातील महिलांना पानांची सजावट व पुष्पगुच्छ निर्मितीचे प्रात्यक्षिक!

आंदुर्लेत उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

कुडाळ : उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी महिला बचत गटातील महिलांसाठी पानांची सजावट (Leaf Manipulation) व पुष्पगुच्छ निर्मिती (Bouquet Preparation) याबाबत प्रात्यक्षिक आयोजित केले.
    आंदुर्ले येथे आयोजित या प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या पानांचा कलात्मक वापर करून त्यांची आकर्षक मांडणी कशी करावी, तसेच उपलब्ध फुले व पानांचा वापर करून सुंदर व आकर्षक पुष्पगुच्छ कसा तयार करावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. महिलांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत प्रत्यक्ष पद्धतीने विविध तंत्रे शिकून घेतली.
      या उपक्रमाचा उद्देश महिलांमध्ये फुलांची सजावट, मूल्यवर्धन, कौशल्य विकास तसेच स्वयंरोजगार व उत्पन्ननिर्मितीच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
      हे प्रात्यक्षिक उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील डॉ. एन. आर. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली RHWE विद्यार्थिनींनी घेतले. महिलांनी प्रात्यक्षिकाचे कौतुक करून अशा प्रकारच्या कौशल्यवर्धक उपक्रमांचा भविष्यातही लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

error: Content is protected !!