
कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना कमी खर्चातील सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन
कुडाळ : ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत अणाव गावात अझोला जैवखत निर्मितीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषीकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अतुल्या एम. यांनी शेतकऱ्यांना अझोलाची निर्मिती, संवर्धन व शेतीमध्ये त्याचा उपयोग याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.
अझोला हे जलद वाढणारे जलवनस्पतीजन्य जैवखत असून त्यापासून सेंद्रिय जैवभार व पोषकद्रव्ये मिळतात. त्याचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत होते. विशेषतः भात पिकामध्ये अझोलाचा जैवखत म्हणून उपयोग करता येतो.
या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना कमी खर्चात अझोलाची निर्मिती व संवर्धन कसे करावे, तसेच शेतीमध्ये त्याचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत उपयुक्त माहिती मिळाली. कृषीकन्यांच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये जैवखतांचा वापर व शाश्वत शेती पद्धतींबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.










