
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नाट्य रसिकांची मोठी गर्दी
आज रंगणार संयुक्त दशावतारचा ‘रावण-मंदोदरी विवाह’ नाट्यप्रयोग

कुडाळ : प्रतिनिधी
लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित १४ व्या मान्सून महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा कुडाळ (रेल्वेस्टेशन रोड नजिक) येथील सिद्धिविनायक हाॅलच्या सभागृहात काल शनिवारी (१५ ऑगस्ट) सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उद्घाटनानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत दशावतारी कलाकारांच्या संचात ‘वीरभक्त तरणीसेन’, हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर झाला. नाट्यप्रयोग पाहण्यासाठी पहिल्या दिवशी नाट्य रसिकांची मोठी गर्दी झाली. या महोत्सवातील ‘रावण-मंदोदरी विवाह’ हा दुसरा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग आज रविवार १६ ऑगस्ट रोजी सायं. ६.३० वाजता होणार आहे.
लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या वतीने येथील सिद्धिविनायक हाॅल येथे या दोन दिवशीय मान्सून महोत्सव २०२६चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दशावतार नाट्य रसिकांना दशावतार कलाकारांसोबत आपला फोटो काढण्यासाठी रंगपटाजवळ सेल्फी पॉईंट बनवण्यात आला असून नाट्यरसिकांनी सेल्फी पॉईंट कडे फोटो काढून आठवणी स्मरणात ठेवाव्यात हाच यामागील उद्देश आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन सेवानिवृत्त गटविकास अधिकारी तथा रंगभूमी सेन्सॉर बोर्डचे सदस्य विजय चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर उद्योजक पप्पू पाटणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंतकाका तेंडोलकर, लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर, ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर, कथा लेखक अजित गाडगीळ (मळेवाड), गजानन गावस (गोवा), कवठी युवक मित्रमंडळ (मुंबई)चे अध्यक्ष संजय करलकर, दशावतारी कलाकार सिद्धेश कलिंगण, प्रा.वैभव खानोलकर, संजय मांजरेकर, स्वरूप सावंत, दिपक भोगटे, पद्माकर वालावलकर, सिद्धेश वर्दम, गोट्या कोरगावकर, अनुप शिरसाट, सिद्धेश बांदेकर, नागेश नार्वेकर, प्रशांत (मामा) घावनळकर, अभी पावसकर, प्रितम कवठकर, साईश अरवारी यांच्यासह लाजरी ग्रुपचे सभासद, नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार राजू पाटणकर व सहका-यांनी केला. खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे बाबा मेस्त्री, दशावतारी कलाकार नारायण आसयेकर, सिद्धेश कलिंगण, चारूदत्त तेंडोलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.
उद्घाटनानंतर लगेचच संयुक्त दशावतारी नाट्य मंडळाच्या सादर झालेल्या ‘वीरभक्त तरणीसेन’ हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी सिंधुदुर्गासह मुंबई, गोवा तसेच विविध भागातील नाट्यरसिकांनी उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. या नाटकात प्रतीक कलिंगण (गणपती), मामा माळकर (मकराक्ष), सागर गावकर (तरणीसेन), बाबा मयेकर (रावण), सुधीर तांडेल (माता सरमा), दत्तप्रसाद शेणई (श्रीराम), गौरव शिर्के (लक्ष्मण), मोरेश्वर सावंत (शैलुष), प्रशांत मयेकर (मारूती), महेंद्र कुडव (विभीषण) आणि सुयश ठाकूर (सुग्रीव) यांनी भूमिका साकारून वाहवा मिळवली. त्यांना संगीत साथ पप्पू घाडीगावकर (हार्मोनियम), किसन नेमळेकर (पखवाज) व हरेश नेमळेकर (तालरक्षक) यांनी दिली.
आज ‘रावण-मंदोदरी विवाह’ नाट्यप्रयोग!
रविवार, १६ ऑगस्ट रोजी ‘रावण-मंदोदरी विवाह’ हा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. यात प्रतीक कलिंगण (गणपती), अक्षय सातार्डेकर (शंकर), साईल तळकटकर (इंद्र), जयराम बाणे (चंद्र), गिरीश राऊळ (विभीषण), दत्तप्रसाद तवटे (वाली), रोहित नाईक (मयासूर), संजय काळे (रावण), सागर हनपाडे (नारद), पवन वालावलकर (हेमाअप्सरा), सिद्धेश मुननकर (पार्वती), यश जळवी (मधुरा/मंदोदरी) आणि श्रीराम साईल (वैदूबाई) यांच्या भूमिका असणार आहेत. या नाटकाला आशीष तवटे (हार्मोनियम), राजेश आकेरकर (पखवाज) आणि बाबू कोरगावकर (तालरक्षक) यांची संगीत साथ लाभणार आहे. दोन्ही नाटकांची कथा व संकल्पना अजित गजानन गाडगीळ (मळेवाड) यांची आहे. या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी दशावतारप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू प्रकाश पाटणकर व राजेश म्हाडेश्वर तसेच लाजरी ग्रुप सदस्यांनी केले आहे.










