ठळक घडामोडी

पणदूर आरोग्य केंद्रात जनकल्याण समितीच स्थापन नाही; जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा संताप!

समिती स्थापन न केल्यास १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा

पल्स पोलिओ मोहिमेचे निमंत्रण न दिल्याचा आरोप; प्रशासनाचे वेधले लक्ष

कुडाळ : प्रतिनिधी
        प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदूर येथे जनकल्याण समिती स्थापन न केल्याने पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तात्काळ जन कल्याण समिती स्थापन करण्यात यावी, अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा श्री.सडवेलकर यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदनातून दिला आहे.
        श्री.सडवेलकर यांनी या निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जन कल्याण समिती स्थापन करण्यात आलेली नाही. लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे अपमानित करण्याची वागणूक दिली जात असेल, तर सर्वसामान्य रुग्णाला मिळत असणारी वागणूक विचार करावयास लावणारी आहे, असे त्यांनी नमूद करून नाराजी व्यक्त केली. प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी राबविण्यात आली. यावेळी या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपणाला निमंत्रण देणे आवश्यक होते. मात्र सदर कार्यक्रमाचे आपणाला निमंत्रणही देण्यात आलेले नाही. त्यामुळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर मनमानी कारभार करीत असून तात्काळ जन कल्याण समिती स्थापन करण्यात यावी, अन्यथा स्वातंत्र्यदिनी प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथे आपल्याला लाक्षणिक उपोषण करावे लागेल, याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहिल, या संदर्भात पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार नाही, असा इशारा श्री.सडवेलकर यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रत त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्र व कुडाळ पोलीस निरीक्षक यांना दिल्या असल्याची माहीती श्री.सडवेलकर यांनी दिली.

error: Content is protected !!