
पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या ‘त्या’ अंड्यांची विल्हेवाट
घटनेची माहीती मिळताच दादा साईल यांची घटनास्थळी धाव
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई–गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथील ब्रीजजवळ महामार्गालगत मोठ्या प्रमाणात पडलेल्या कोंबडीच्या अंड्यांची शुक्रवारी तातडीने विल्हेवाट लावण्यात आली. अंडी फुटल्याने परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबतचे वृत्त लक्ष न्यूज सिंधुदुर्गने सर्वात प्रथम प्रसिद्ध केले होते.
या घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच परिसरात अस्वच्छता निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित व्यावसायिकाशी संपर्क साधून त्यांना सावंतवाडी येथून घटनास्थळी बोलावून घेण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या सहकार्याने महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची योग्य पद्धतीने तातडीने विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी दिलीप बिल्डकॉन कंपनीचे उपअभियंता उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्या तसेच परिसरातील स्वच्छतेशी संबंधित बाबींवर तातडीने दखल घेऊन कार्यवाही करणे ही आपली जबाबदारी असून, नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असे दादा साईल यांनी सांगितले.










