ठळक घडामोडी

कुडाळ-मालवणची आरोग्य व्यवस्था डॉक्टरांविना व्हेंटिलेटरवर; आमदार निलेश राणेंनी ऑन फिल्ड पाहणी करावी!

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी

कुडाळ महिला व बाल रुग्णालय, मालवण ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ-मालवण तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे अडचणीत आली असून, ती अक्षरशः ‘व्हेंटिलेटरवर’ असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयातील परिस्थितीची स्थानिक आमदार निलेश राणे यांनी निदान एकदा तरी प्रत्यक्ष ‘ऑन फिल्ड’ पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
    श्री.किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलेय की, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडत असतात. तसेच पर्यटन व उद्योगवाढीसाठी मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचेही दिसून येते. मात्र, कुडाळ-मालवणमधील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर समस्यांबाबत अपेक्षित आक्रमक भूमिका दिसून येत नसल्याची टीका किनळेकर यांनी केली आहे.
      तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांची गैरसोय
     कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मालवण ग्रामीण रुग्णालयातही तज्ज्ञ प्रसूती डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे किनळेकर यांनी म्हटले आहे.
     शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने सामान्य रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून, त्याचा आर्थिक भार रुग्णांच्या कुटुंबीयांवर पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
      सत्ताधारी-विरोधकांनी आवाज उठवूनही प्रश्न कायम!
     या समस्येबाबत अनेकदा विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनीही आवाज उठविला आहे. मात्र, त्यानंतरही शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक डॉक्टर उपलब्ध झाले नसल्याचा आरोप किनळेकर यांनी केला.
     विकासाच्या विविध योजनांवर चर्चा होत असताना सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. कुडाळ महिला व बाल रुग्णालय तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून डॉक्टर व तंत्रज्ञांची रिक्त पदे तातडीने भरावीत आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!