
सिंधुदुर्गनगरी : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ओरोस बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने यंदाचा ध्वजारोहण सोहळा सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला. गावातील अंगणवाडी सेविका श्रीम. श्रद्धा तावडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच पांडुरंग उर्फ अमोल मालवणकर यांच्या पुढाकारातून हा अनोखा सन्मान देण्यात आला.
तळागाळातील बालकांच्या संगोपनासह त्यांच्या आरोग्य व पोषणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकेला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणाचा बहुमान देण्यात आल्याने या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे. महिलांचा आणि समाजातील सामान्य घटकांचा सन्मान करणारा हा निर्णय प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ध्वजारोहणानंतर शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, राष्ट्रगीत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या राष्ट्रभक्तीपर सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी प्रभारी सरपंच पांडुरंग उर्फ अमोल मालवणकर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या सोहळ्यास ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, स्थानिक मान्यवर, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, शिक्षक, अंगणवाडी मदतनीस, ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकेच्या हस्ते ध्वजारोहण करून ओरोस ग्रामपंचायतीने तळागाळात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान आणि सामाजिक समतेचा प्रेरणादायी संदेश दिला.










