

कुडाळ : पीएमश्री जि.प. प्राथमिक शाळा कुडाळ-कुंभारवाडा येथे ८० वा स्वातंत्र्यदिन विविध देशभक्तीपर उपक्रमांनी जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सायली कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत गायनासह निबंध, वक्तृत्व, देशभक्तीपर गीत गायन, रंगभरण, चित्रकला, हस्तकला प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, कविता गायन, प्रभात फेरी, संगीत कवायत व देशभक्तीपर घोषणा असे विविध उपक्रम घेण्यात आले. तसेच नशामुक्ती शपथ, पॉश ॲक्ट २०१३ शपथ आणि निपुण साक्षर प्रतिज्ञा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धा व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशालेने क्रांतिदिनापासूनच या उपक्रमांना सुरुवात केली होती. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान जागृत करण्याबरोबरच स्वातंत्र्याचा इतिहास, क्रांतिवीरांचे कार्य आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या देशभक्तांप्रती आदर व कृतज्ञतेची भावना रुजविण्यात आली. तसेच सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये घडविण्यात आले.
कार्यक्रमावेळी नगरसेविका अक्षता खटावकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या श्रीमती मंगला म्हापणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना गोड लाडू वाटप केले. या उपक्रमाला दोन्ही सत्रांतील पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
यावेळी नगरसेवक तथा विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे अध्यक्ष श्री. उदय मांजरेकर, नगरसेवक श्री. गणेश भोगटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती श्रद्धा देसाई, उपाध्यक्ष श्री. मायकल फर्नांडिस, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गोविंद सावंत, श्री. सदानंद खवणेकर, श्री. कृष्णा घाडी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, निपुण लीडर माता-पालक, पालक, सर्व अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आणि शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
नगरसेवक उदय मांजरेकर आणि मुख्याध्यापिका सायली कदम यांनी यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी हस्तकला प्रदर्शन, विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग, वक्तृत्व तसेच विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद पाहून त्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले आणि उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका श्रीमती सायली कदम, शिक्षक विजय धामापूरकर, श्रीमती वंदना परब, श्रीमती चैत्राली पाटील, श्रीमती ऋतुजा गावडे, श्रीमती स्वराली लाड, श्री. गुरुप्रसाद सावंत, श्रीमती गौरी गोसावी आणि श्रीमती दीपाली मोहिते उपस्थित होते. शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










