
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठातांची रुपेश पावसकर यांनी घेतली सदिच्छा भेट
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले. तसेच अधिष्ठाता म्हणून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान रुपेश पावसकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध गंभीर समस्यांकडे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांचे लक्ष वेधले. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्याची मागणी त्यांनी केली.
ओपीडीसमोरील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर
बाह्य रुग्ण विभागाच्या (ओपीडी) समोर बांधण्यात आलेल्या गटारात पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्रितपणे साचत असल्याचा मुद्दा पावसकर यांनी अधिष्ठातांच्या निदर्शनास आणून दिला. या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, त्यातून साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली.
महाविद्यालयातील पूर्वाश्रमीच्या अधिष्ठातांच्या कार्यकाळात खरेदी करण्यात आलेल्या विविध वस्तू व वैद्यकीय साहित्याच्या गुणवत्तेबाबतही पावसकर यांनी प्रश्न उपस्थित केला. संबंधित साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत या खरेदी प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. रुग्णालयाच्या कामकाजात पारदर्शकता आणि रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, रुपेश पावसकर यांनी मांडलेल्या विविध समस्यांची नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांनी दखल घेतली असून, संबंधित प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा नारायणकर, ओरोस येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष परब यांच्यासह अन्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.










