
ठाकरे शिवसेना-युवासेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे मागणी
कुडाळ : गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव खोऱ्यातील एस.टी. बस फेऱ्या नियमित, सुरळीत व वेळेत सुरू ठेवाव्यात तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त बस फेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ठाकरे शिवसेना युवासेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माणगाव खोऱ्यात सुमारे २६ ते २७ गावे असून, कुडाळ आगारातून माणगाव खोऱ्यातील विविध गावांसह शिवापूरपर्यंत एस.टी. बस सेवा सुरू आहे. गणेश चतुर्थीच्या काळात मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये कामानिमित्त असलेले असंख्य चाकरमानी आपल्या गावी परततात. त्यामुळे या काळात एस.टी. बससेवेवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा भार वाढतो.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एस.टी. ही प्रमुख व विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने गणेशोत्सवाच्या काळात बस फेऱ्या अनियमित झाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि गणेशभक्तांना याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत माणगाव खोऱ्यातील सर्व नियमित एस.टी. बस फेऱ्या वेळापत्रकानुसार वेळेत व सुरळीत चालविण्यात याव्यात. तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यक त्या मार्गांवर अतिरिक्त बस फेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावनेशी निगडित असलेला महत्त्वाचा सण असल्याने कुडाळ आगार प्रशासनाने विशेष नियोजन करून माणगाव खोऱ्यातील एस.टी. वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य तथा युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग प्रमुख शैलेश विर्णोडकर, माणगाव तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील सावंत, ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, माजी विभाग प्रमुख अजित करमळकर आदी उपस्थित होते.










