ठळक घडामोडी

कुडाळ शहर भाजपाची महावितरणला धडक; वीज समस्यांचा वाचला पाढा!

जीर्ण पोल, कमी दाबाचा वीजपुरवठा अन् धोकादायक झाडांवर भाजप आक्रमक

गणेशोत्सवापूर्वी वीज तक्रारी सोडवा; भाजपचा महावितरणला अल्टिमेटम

कुडाळ : शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाचा वीजप्रवाह, जीर्ण झालेले वीजखांब तसेच वीजवाहक तारांवर आलेली धोकादायक झाडे या समस्यांबाबत कुडाळ शहर भाजपाने आज महावितरण प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील वीज समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचत गणेश चतुर्थीपूर्वी सर्व तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.
      कुडाळ शहरातील विविध भागांत जुने व जीर्ण झालेले वीजखांब असून, काही ठिकाणी कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच वीजवाहक तारांवर धोकादायक आणि जीर्ण झालेली झाडे आल्याने भविष्यात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशी झाडे तातडीने तोडून वीजवाहिन्या सुरक्षित करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गणेशशाळांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी सुरू आहे. मात्र, वारंवार वीज खंडित होत असल्याने गणेशशाळांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही भाजपकडून करण्यात आली.
     शहरातील वीज समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असून, गणेश चतुर्थीपूर्वी त्यांचे तातडीने निवारण करावे, अन्यथा तीव्र भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राजू राउळ, तालुका चिटणीस राजू गवंडे, शहराध्यक्ष सुनील बांदेकर, महिला शहराध्यक्षा सौ. मुक्ती परब, नगरसेविका सौ. श्रेया गवंडे, सौ. ज्योती जळवी, नगरसेवक उदय मांजरेकर, निलेश परब, माजी नगरसेवक सचिन काळप आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!