ठळक घडामोडी

शिंदे शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळातील खड्डे बुजविण्यास सुरुवात!

शहरप्रमुख अभिषेक गावडेंचा पाठपुरावा; सा.बां.कडून प्रत्यक्षात कामाला सुरु

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शिंदे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी काल सोमवारी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी करत गावडे यांनी ठोस कार्यवाही होईपर्यंत ठिय्या आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यानंतर विभागाने कुडाळ-कविलकाटे मार्गावरील खड्डे १ सप्टेंबरपासून बुजविण्याचे लेखी आश्वासन दिले.
     त्यानुसार आज मंगळवारपासून कुडाळ-कविलकाटे मार्गासह उदयमनगर – काॅलेज चौक परिसरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या कामाची अभिषेक गावडे व नगरसेवक विलास कुडाळकर यांनी पाहणी केली. कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर काम सुरू होते. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशन रोडवरील खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजविणे तसेच रस्त्यालगतच्या झाडी छाटणीची कामेही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आली आहेत.

error: Content is protected !!