ठळक घडामोडी

बिबवणेत भरदिवसा धाडसी घरफोडी; १३ लाखांचा ऐवज लंपास!

मुंबई-गोवा महामार्गालगत बंद घराला चोरट्यांचा डल्ला; श्वान पथकाकडून तपास

कुडाळ पोलिसांसह एलसीबीकडून चोरट्यांचा शोध

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बिबवणे-नाईकवाडी येथे  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. काल सोमवारी सायंकाळी उशिरा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी सुमारे ८ तोळे सोन्याचे दागिने (सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे किंमत १२ लाख रूपये) व १ लाख ९ हजार ५०० रुपये रोख, असा सुमारे १३ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची फिर्याद सरोज शरद चव्हाण यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
     पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, सरोज शरद चव्हाण व त्यांचे पती सोमवारी सकाळी कामावर गेले होते, तर त्यांची मुलगी सकाळी ८.१५ वाजता घराला कुलूप लावून कॉलेजला गेली. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश करून दोन बेडरूममधील कपाटे फोडली व सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. सायंकाळी घराचे दिवे लागलेले दिसत नसल्याने शेजारी राहणारे ग्रामस्थ घराकडे गेले. त्यांना घराचा दरवाजा उघडा व आतील साहित्य अस्ताव्यस्त दिसले. त्यांनी तातडीने शरद व सरोज चव्हाण यांना माहिती दिली. त्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. माहिती मिळताच कुडाळचे पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांनीही पाहणी केली. आज मंगळवारी सकाळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले, तर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथकही तपासासाठी दाखल झाले. अज्ञात चोरट्यांचा कुडाळ पोलीसांसह एलसीबीकडून शोध सुरू आहे, अशी माहीती कुडाळ पोलीसांकडून देण्यात आली.

error: Content is protected !!