
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
कुडाळ : देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य इंडियनऑइलचा ६७ वा इंडियनऑइल डे कुडाळ येथील जिल्हा परिषद शाळा, एमआयडीसी कुंभारवाडी येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम, कुडाळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात केक कापून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट्स, खाऊ तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. यावेळी इंडियनऑइलचे एरिया सेल्स मॅनेजर रोहित कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इंडियनऑइलचे देशाच्या विकासातील योगदान, ऊर्जा बचतीचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उज्ज्वल भविष्यासाठी ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला लॅक्टोस कंपनीचे जीएम गुरुप्रसाद देसाई, ओंकार देसाई (श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम), मनोज वालावलकर, तृप्ती प्रभूदेसाई तसेच जिल्हा परिषद शाळा एमआयडीसी कुंभारवाडा येथील शिक्षक सहदेव घाडीगावकर, सुरभी शिरोडकर, मधुरा धुरी यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. समाजाशी नाते जोडत पुढील पिढीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी ओंकार देसाई यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.









