ठळक घडामोडी

रानभाज्यांचा सुगंध दरवळला; ५१ प्रकारच्या भाज्या अन् १५० हून अधिक पाककृतींची मेजवानी!

कुडाळ पंचायत समितीच्या तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व पाककृती महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : रासायनिक खतांच्या वापरामुळे पिकविल्या जाणाऱ्या भाज्यांच्या वाढत्या वापराच्या काळात निसर्गाच्या कुशीतून मिळणाऱ्या रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कुडाळ पंचायत समितीच्या वतीने येथील महालक्ष्मी हॉल येथे मंगळवारी तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व पाककृती महोत्सवाचे दिमाखात आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात तब्बल ५१ प्रकारच्या ताज्या रानभाज्या आणि १५० हून अधिक चविष्ट पाककृतींचे स्टॉल्स मांडण्यात आल्याने नागरिकांचे लक्ष वेधले.
     यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. रानभाज्यांच्या विविध प्रकारांसह त्यापासून तयार करण्यात आलेल्या पारंपरिक व नाविन्यपूर्ण पाककृती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
जि. प. उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांनी ऋतुमानानुसार आहार घेण्याचे आणि पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित केले. पूर्वीचे आपले पूर्वज निसर्गाच्या चक्रानुसार आहाराचे नियोजन करत असल्याने निरोगी आयुष्य जगत होते. आजच्या आधुनिक काळातही निरोगी पिढी घडविण्यासाठी रानभाज्यांकडे पुन्हा वळण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. महिलांनी तयार केलेल्या अळूच्या देठांच्या कुरकुरीत कापांसह विविध पाककृतींचे त्यांनी कौतुक केले. रानभाज्यांचे केवळ प्रदर्शन न करता त्यांचे संवर्धन तसेच व्यावसायिक उत्पादन होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सभापती मिलिंद नाईक यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत लाजरीची भाजी आणि अळूच्या विविध प्रकारांचे आरोग्यदायी फायदे सांगितले. रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या भाज्यांपेक्षा रानभाज्या अधिक पोषक असून, प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले. हा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
जि. प. सदस्य रुपेश कानडे यांनी प्रदर्शनातील रानभाज्या रासायनिक खतांविरहित व आरोग्यदायी असल्याचे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी जि. प. सदस्य आरती पाटील, माजी जि. प. अध्यक्ष काका कुडाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्थानिक महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि रानभाज्यांपासून तयार होणाऱ्या पारंपरिक पाककृतींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये, तर पाच महिलांना प्रत्येकी १ हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
मंत्रालयातील महत्त्वाच्या बैठकीमुळे कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेले आमदार निलेश राणे यांनी दूरध्वनीवरून महोत्सवाला तसेच सहभागी महिलांना विशेष शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपसभापती सीताराम तेली, जि. प. सदस्य सुप्रिया वालावलकर, नागेश आईर, मंगेश प्रभू, बाळकृष्ण मडव, प्रफुल्ल वालावलकर, गटविकास अधिकारी श्री. हिर्लेकर, सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, मृणाल कार्लेकर, निखिल कांदळगावकर, सौ.प्रियांका जळवी, सौ. अश्विनी सावंत, सौ. श्रावणी तेरसे, सौ.करूणा पावसकर, सौ. दिव्यानी खरात यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!