ठळक घडामोडी

खड्डे बुजवण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक रस्त्यावर…हेच खरे त्यांचे अपयश!

शिवसेना (उबाठा) कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांचे टीकास्त्र

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ शहर व परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ शहरप्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक संतोष शिरसाट यांनी प्रशासनावर आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघाती टीका केली आहे. “रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनाच स्वतः रस्त्यावर उतरून काम करून घ्यावे लागत आहे, हीच प्रशासनाच्या कारभाराची आणि स्थानिक आमदार निष्क्रिय ठरल्याची खरी शोकांतिका आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
     श्री.शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,शहरात नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असताना नगरपालिका आणि सार्व. बांधकाम प्रशासन पूर्णपणे सुस्तावलेले आहे. वेळेत दुरुस्तीची कामे न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सत्ताधाऱ्यांचे आणि आ. निलेश राणे यांचे अपयश  आहे. सत्ता हातात असूनही जर लोकप्रतिनिधींना खड्डे भरण्यासाठी स्वतः रस्त्यावर उभे राहावे लागत असेल, तर यावरून प्रशासनावर कोणाचाही धाक उरलेला नाही हे स्पष्ट होते. मुख्य रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. केवळ निवडणुका किंवा विरोधकांच्या टीकेनंतरच काम दाखवण्यासाठी ही धावपळ केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.निलेश राणे हे विधानसभा सदस्य म्हणून पूर्णपणे अयशस्वी  ठरले आहेत. विधानसभेत फक्त मोठी मोठी भाषणं ठोकायची पण मतदारसंघात प्रत्यक्षात विकासाच्या नावाने बोंब अशी अवस्था या  आमदार महोदयांची झाली आहे,  प्रशासनाने तातडीने २ दिवसात सर्व प्रमुख रस्ते व नगरपंचायतीच्या हद्दीतील खड्ड्यांची योग्य व दर्जात्मक मलमपट्टी करावी, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री. शिरसाट यांनी दिला आहे.

error: Content is protected !!