
घोषवाक्यांतून समाजजागृतीचा प्रभावी संदेश; कुडाळमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा
पालकांनी मुलांवर शैक्षणिक बंधने लादू नयेत; मोकळ्या वातावरणात घडू द्या : उमेश गाळवणकर
कुडाळ : स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी विविध आव्हाने स्वीकारून जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी वाटचाल करावी, असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केले.
दत्ताविष्कार फाऊंडेशन सिंधुदुर्ग, आरंभ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि आस्था फाऊंडेशन, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ. नाथ पै कॉलेज, एमआयडीसी कुडाळ येथे आयोजित राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. ज्ञान, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बॅ. नाथ पै संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, दत्ताविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल चव्हाण, केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण, आरंभ प्रतिष्ठानचे उदय शिरोडकर, डॉट कॉम असोसिएशनचे अध्यक्ष संजय बगळे, त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचे संचालक डॉ. राहुल गव्हाणकर, राजाराम गव्हाणकर, स्वप्नाली सावंत, विद्या शिरोडकर, सायली शिरोडकर, आयुषी चव्हाण, दिलीप मसके, यलाप्पा दळवी, मारुती गुंजाळ, सहदेव घाडी, मिनीनाथ आडसरे, राजेश परब, सहदेव पालकर, योगेश जाधव, विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर म्हणाल्या, “घोषवाक्याच्या माध्यमातून कमी शब्दांत प्रभावीपणे समाजजागृती करता येते. एआय आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, मुलाची आवड व कल लक्षात घेऊन त्याला योग्य क्षेत्राची निवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.”
अमोल चव्हाण यांनी मुलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी तिन्ही संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच महिलांनी छोट्या व्यवसायातून आर्थिक उन्नती साधावी, यासाठीही विविध व्यावसायिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उमेश गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्यांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. पालकांनी आत्मपरीक्षण करून मुलांना समजून घेणे गरजेचे आहे. मुलांवर शैक्षणिक क्षेत्रातील कोणतेही बंधन लादण्याऐवजी त्यांना मोकळ्या वातावरणात शिक्षणाचा सामना करण्यास शिकवावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात उदय शिरोडकर यांनी तिन्ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य आणि कला क्षेत्राशी निगडित असून या सर्व क्षेत्रांना सहकार्य करण्याचा संस्थांचा उद्देश असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात त्रिमूर्ती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने केली. सूत्रसंचालन मारुती गुंजाळ यांनी केले, तर यलाप्पा दळवी यांनी आभार मानले.









