ठळक घडामोडी

स्थानिकांना डावलून परराज्यातील व्यक्तीला मंगल कार्यालयासाठी एमआयडीसी मधील भूखंडाचे वाटप!

कुडाळ एमआयडीसीत भूखंड वाटपात मोठा घोळ; स्थानिक नागरिकांचा आरोप

वैभव नाईकांसह नागरिक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला जाब

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ एमआयडीसीमधील उद्योग-कारखान्यांसाठी राखीव भूखंड परराज्यातील व्यक्तीला मंगल कार्यालय व मंदिर बांधण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी एमआयडीसी अधिकारी अविनाश रेवंडकर यांच्या कार्यालयात धडक देत जाब विचारला.
यावेळी रेवंडकर यांनी संबंधित भूखंडाचे अद्याप वाटप झालेले नसल्याचे सांगितले. मात्र, वाटप झालेले नसताना शासकीय जमिनीवर उत्खनन कसे झाले, असा सवाल वैभव नाईक व ग्रामस्थांनी केला. अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष भूखंडाची पाहणी केली असता तेथे उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर अवैध उत्खननप्रकरणी गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर यांच्याकडे तक्रार दिली आहे.
एमआयडीसीच्या स्थापनेवेळी स्थानिक जमीनमालकांकडून उद्योग व कारखाने उभारले जाणार या उद्देशाने जमीन घेण्यात आली होती. त्यावेळी जमीनमालकांना प्रति गुंठा ४२ रुपये मोबदला मिळाला होता. त्यामुळे स्थानिकांना डावलून परराज्यातील व्यक्तीला मंगल कार्यालय व मंदिरासाठी भूखंड देण्यास आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी या भूखंडावर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती असून, तो कार्यक्रम झाल्यास उधळून लावू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी एमआयडीसीचे रत्नागिरी एरिया मॅनेजर संजय कसबे, अविनाश रेवंडकर, मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर, ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, विजय प्रभू, बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, बाळा पावसकर, अतुल बंगे, योगेश धुरी, सुशील चिंदरकर, अमित राणे, गुरु गडकर, अजित मार्गी, प्रभाकर गावडे, दीपक गावडे, रामा कांबळी, स्वप्निल गावडे, महेश गावडे, केदार गावडे, भूषण गावडे, कृष्णा मराठे, राजन धोंड, विनय गावडे, बाबी आळवे, श्रीधर कोरजुवेलर, प्रथमेश गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!