ठळक घडामोडी

नवी मुंबईचे नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या माध्यमातून कुडाळ हायस्कूलच्या १०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली!

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला किशोर पाटकर यांचा हातभार; आतापर्यंत जिल्ह्यात शेकडो सायकलींचे वाटप

कुडाळ : प्रतिनिधी
      नवी मुंबईचे नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या माध्यमातून आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश परब यांच्या सौजन्याने प्राप्त झालेल्या मोफत सायकलींचे वितरण कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील १०० गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले. सायकल हाती मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले.
      या कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संस्था उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, मुख्याध्यापक बिपिन वराडे, माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, अनंत वैद्य, विनायक राणे, माजी मुख्याध्यापक का. आ. सामंत, देवेंद्र नाईक, नगरसेवक गावडे, ॲड. राजीव कुडाळकर, विलास कुडाळकर, दत्तप्रसाद शेणई, प्रतिभा पाटणकर, अरविंद करलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
     अरविंद शिरसाट यांनी उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, छत्र्या आदी साहित्याचे वाटप होत असते; मात्र सुमारे १० हजार रुपये किमतीची सायकल मोफत देणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीचे तसेच खासदार नारायण राणे यांच्या संस्कारांचे कौतुक केले. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या दातृत्वाबद्दल आभार मानले.
     दत्ता सामंत यांनी शिक्षणासोबतच संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. शाळा शिक्षण देते; मात्र आई-वडिलांनी दिलेले संस्कार मुलाचे भविष्य घडवतात, असे सांगत त्यांनी पालकांनी मुलांना रामरक्षा व अथर्वशीर्ष शिकवावे, असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी हुशार मुलांची संगत ठेवून प्रगती साधावी, असा संदेश दिला. यावेळी संजय पडते, श्री. वैद्य सर तसेच पालक प्रतिनिधी विद्याधर चारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला काही विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.
     ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासाची सुविधा मिळावी आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. किशोर पाटकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध हायस्कूलमधील हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले आहे.

error: Content is protected !!