ठळक घडामोडी

कुडाळ इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलचे सहाय्यक शिक्षक प्राजक्त चव्हाण यांना विधी शाखेची पदवी!

मुख्याध्यापिका व शिक्षकवृंदाकडून सत्कार

कुडाळ : क. म. शि. प्र. मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कुडाळ येथील सहाय्यक शिक्षक प्राजक्त चव्हाण यांनी मुंबई विद्यापीठाची विधी शाखेची (LL.B.) पदवी संपादन केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
      कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजमधून विधी शिक्षण पूर्ण करून मुंबई विद्यापीठाची LL.B. पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख यांनी प्राजक्त चव्हाण यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव केला. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेतील शिक्षकवृंदानेही श्री.चव्हाण यांचे अभिनंदन केले.
     प्राजक्त चव्हाण यांना सुरुवातीपासूनच शिक्षणासोबतच सामाजिक कार्याची आवड आहे. कष्टकरी व कामगार वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सामाजिक उपक्रम राबविले असून, श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. विधी शाखेच्या पदवीचा उपयोग कष्टकरी, कामगार तसेच गरजू नागरिकांच्या जनकल्याणासाठी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शिवसेना पक्षाकडून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या अनुसूचित जाती प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या नियुक्तीवेळी आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते.
      शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक व कामगार क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्राजक्त चव्हाण यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले.
      “विधी शाखेचे शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता, समाजातील कष्टकरी व गरजू घटकांच्या हितासाठी त्याचा उपयोग करणार,” अशी भावना प्राजक्त चव्हाण यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!