

आमदार निलेश राणे यांची तत्परता; सभापती मिलिंद नाईक यांच्या सूचनेनंतर एसटीच्या नियोजनात बदल
कुडाळ : येथील एसटी आगारातून चालणाऱ्या ग्रामीण व प्रवासी हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ५७ एस.टी. बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या गंभीर प्रश्नासंदर्भात आज दुपारी ३ वाजता कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीला विद्यमान सभापती मिलिंद नाईक, आगार प्रमुख रोहित नाईक, आमदार निलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक योगेश घाडी, राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या कुडाळ आगार अध्यक्षा रश्मी नाईक तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे विभागीय सरचिटणीस रोशन तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील बसफे-या बंद ठेवल्यास ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर ग्रामीण भागातील नागरिक, गणेश भक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेत, आमदार निलेश राणे यांनी तत्परतेने दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार सभापती मिलिंद नाईक यांनी एसटी डेपोत जाऊन प्रशासनाशी चर्चा केली.
बैठकीदरम्यान बंद ठेवण्यात आलेल्या ५७ बसफेऱ्यांबाबत आगार प्रशासनाला जाब विचारण्यात आला तसेच ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, कामगार व सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या सर्व फेऱ्या तात्काळ सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली. या चर्चेची दखल घेऊन संबंधित ५७ बसफेऱ्या तात्काळ पूर्ववत करीत आजच्या सर्व फेऱ्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, शालेय विद्यार्थ्यांसह गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कुडाळ आगार प्रमुख रोहित नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आगाराच्या गणेशोत्सव विशेष नियोजनाची माहिती दिली आहे. मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी त्यांच्या गावी आणण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनेनुसार कुडाळ आगारातून 15 बसेस पाठविण्यात येणार आहेत.
त्यामुळे कमी प्रवासी भारमानाच्या 8 ते 10 फेऱ्या तसेच लांब पल्ल्याच्या 14 फेऱ्या नियोजित बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या बसेस मुंबई-ठाणे येथे पाठवूनही बुधवारी (9 सप्टेंबर रोजी) ग्रामीण भागातील सर्व बसफेऱ्या सुरळीत मार्गस्थ करण्यात आल्याचे आगार प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापुढेही ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या मार्गस्थ करण्याचा प्रयत्न राहणार असला तरी बसेस तसेच चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे 12 सप्टेंबरपर्यंत ग्रामीण भागातील सुमारे 8 ते 10 फेऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आगार प्रशासनाने व्यक्त केली आहे. यामध्ये काही फेऱ्या उशिराने सुटू शकतात किंवा परिस्थितीनुसार रद्द होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कुडाळ आगाराच्या बसेस 12 सप्टेंबर रोजी परत आगारात येईपर्यंत प्रवासी व गणेशभक्तांनी एसटी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आगार प्रशासनाने केले आहे.









