ठळक घडामोडी

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा आंदोलनाची हाक; ५ ऑक्टोबरपासून आझाद मैदानावर राज्यव्यापी बेमुदत धरणे!

कुडाळातून ७०० हून अधिक नागरिक सहभागी होणार : संजय वेतुरेकर यांची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
           शासनाच्या धोरणांमुळे सरकारी व अनुदानित शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याच्या निषेधार्थ आणि शिक्षण हक्काच्या रक्षणासाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’च्या वतीने ५ ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्रव्यापी बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशी माहिती  ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्गचे समन्वयक संजय वेतुरेकर यांनी दिली.
          कुडाळ येथील मराठा समाज हॉल मध्ये मंगळवारी या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी विविध सामाजिक संघटना, शिक्षणप्रेमी, संस्थाचालक, सरपंच, शिक्षक आणि पालकांची बैठक पार पडली. या बैठकी नंतर  श्री.संजय वेतुरेकर आणि श्री. अंकुश कदम यांनी पत्रकार परिषद घेत कुडाळ तालुक्यातून किमान ७०० हून अधिक नागरिक मुंबई येथील आंदोलनात सहभागी होतील, असा ठाम निर्धार व्यक्त करत आंदोलनाची पार्श्वभूमी व मागण्या स्पष्ट केल्या. यावेळी प्रशांत आडेलकर,युगांत चव्हाण, आर्या होळकर, स्नेहा शिरसाट, ज्ञानेश्वर सावंत,आनंद राठये उपस्थित होते.
        संजय वेतुरेकर म्हणाले कि,स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाचे विकेंद्रीकरण होऊन ते गाव-खेड्यांपर्यंत पोहोचले. ज्या शाळांमधून अनेक पिढ्या घडल्या, देश निर्माण झाला, त्याच शाळा आज बंद करण्याचे धोरण शासन राबवत आहे. राज्यभरात हजारो सरकारी व अनुदानित शाळा बंद पडत असून स्वयं अर्थसहाय्यित व खाजगी शाळांचे पेव फुटले आहे. याचा थेट परिणाम ग्रामीण, शोषित, दलित आणि बहुजन घटकांतील मुलांवर होत आहे. शाळा हे केवळ एक इमारत नसून गावचे भूषण आणि गावाचा आत्मा आहे. हे आंदोलन कोणत्याही शिक्षक किंवा नोकरवर्गासाठी नसून, केवळ विद्यार्थी आणि पालक-समाज केंद्रित आहे. शासनाला जागे करण्यासाठी ५ ऑक्टोबरला आझाद मैदानावर आंदोलन सुरू होत असून, कुडाळ तालुक्यातून किमान ७०० तर संपूर्ण जिल्ह्यातून २५०० ते ३००० नागरिक यात सहभागी होतील.असा विश्वास व्यक्त केला.
           श्री. अंकुश कदम म्हणाले कि,गेल्या आठ दिवसांपासून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठका घेत आहोत. शाळा बंद पडण्याच्या सरकारच्या धोरणाविरुद्ध लोकांमध्ये मोठा असंतोष आणि अस्वस्थता पसरली आहे. ५ ऑक्टोबर रोजी पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून १० हजारांहून अधिक लोक या आंदोलनात उतरतील.ही केवळ सरकारविरोधातील लढाई नसून शिक्षण सम्राट आणि भांडवलदारांविरोधातील आरपारची लढाई आहे. करदात्या नागरिकांना आरोग्य आणि मोफत शिक्षण देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. ७० वर्षांत ग्रामस्थांनी पदरमोड करून उभ्या केलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय म्हणजे पूर्वजांच्या त्यागाची थट्टा आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आपल्या राजकीय दबावातून बाहेर पडून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा,असे आवाहन केले.दरम्यान या आंदोलनाची जनजागृती अधिक तीव्र करण्यासाठी उद्यापासून कुडाळ तालुक्यातील गावोगावी लहान-लहान बैठकांचे आयोजन केले जाणार असल्याचेही यावेळी श्री. कदम यांनी सांगितले.

error: Content is protected !!