

कुडाळ नगरपंचायतीची जलसंधारणासाठी तातडीची तयारी सुरु
कुडाळ : पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या आढावा बैठकीतील सूचनांची तात्काळ दखल घेत, कुडाळ नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी कुडाळ शहरातील उपलब्ध बंधारे व अन्य जलस्रोतांची मुख्य अधिकारी कुडाळ नगरपंचायत व अन्य अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरसेविका सौ. नयना मांजरेकर उपस्थित होत्या.
आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून पावसाचे पाणी वाहून न जाता जास्तीत जास्त प्रमाणात पाणी अडवणे, साठवणे आणि जमिनीत मुरवणे यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याचे निर्देश नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले. उर्वरित पावसाच्या कालावधीचा योग्य उपयोग करून शहरातील योग्य ठिकाणी छोटे बंधारे, दगड-मातीच्या साहाय्याने पाणी अडविण्याच्या उपाययोजना, उपलब्ध जलस्रोतांचे संधारण तसेच पाण्याचा नैसर्गिक प्रवाह नियंत्रित करून भूजल पुनर्भरणास चालना देणे, याबाबत प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अशा छोट्या-छोट्या जलसंधारण उपाययोजनांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन विहिरी व भूजलसाठा वाढण्यास हातभार लागू शकतो आणि आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते. नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी नागरिकांनाही आवाहन केले आहे की, “परतीचा पाऊस अजून बाकी आहे… पाणी अडवूया, पाणी वाचवूया!” “प्रत्येक वाडी, प्रत्येक ओढा आणि प्रत्येक योग्य ठिकाण—एक छोटा बंधारा!” पावसाचे पाणी अडविणे या मोहिमेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील ओढे, नाले, छोटे जलप्रवाह व उपलब्ध पाणीसाठे स्वच्छ ठेवावेत, पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता स्थानिक पातळीवर जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्रोत्साहन द्यावे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा,असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.









