ठळक घडामोडी

भातपिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा; जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांचे निर्देश!

दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात आढावा बैठक

दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाला गती; पाणीटंचाई रोखण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती, शेतीचे नुकसान, ई-पीक पाहणी नोंदणी तसेच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई या विषयांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांनी कुडाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद विभागांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा व उपाययोजना करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
      याच अनुषंगाने नेरूर ग्रामपंचायत हॉल येथे नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाची विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी दुष्काळसदृश सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाने तसेच नागरिकांनी तातडीने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या भात पिकाच्या नुकसानीबाबत तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश यावेळी उपाध्यक्ष दादा साईल यांनी दिले.
      दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्याचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून लवकरात लवकर योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आगामी काळात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ नये यासाठी कच्चे बंधारे व वनराई बंधारे उभारणे, नदी-ओहोळातील गाळ काढणे, नादुरुस्त बंधारे, पाझर तलाव व तळी दुरुस्त करणे याबाबत ग्रामपंचायत व प्रशासकीय पातळीवर आतापासूनच योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. पिण्याचे पाणी, चारा व रोजगार हमीच्या कामांवर भर देणे, दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, जनावरांसाठी चारा, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करणे तसेच आवश्यक आराखडे तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
       ई-पीक पाहणी नोंदणी वेळेत करण्याचे आवाहन
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ, पीक कर्ज तसेच नुकसानभरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी अचूक व वेळेत करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून शासनाच्या मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले असून, शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन दादा साईल यांनी केले.
       प्रशासन व ग्रामस्थांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन
        आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी केले. तसेच नागरिकांनी व शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, आगामी काळात पाणी संवर्धन व पाणी बचतीला प्राधान्य द्यावे, रब्बी हंगामातील पिकांचे योग्य नियोजन करावे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही श्री. साईल यांनी केले. शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवून प्रत्येक पीडित कुटुंबाला आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास श्री. साईल यांनी यावेळी व्यक्त केला.
      या बैठकीस भक्ती घाडीगावकर – सरपंच, नेरूर, राजा प्रभू – सरपंच वालावल, स्वाती करलकर – सरपंच कवठी, रावजी कदम – सरपंच सरंबळ, महादेव खरात – विस्तार अधिकारी (कृषी) तसेच सरपंच आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, बचतगट CRP आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!