ठळक घडामोडी

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात एमआयटीएमच्या ‘चौथा स्तंभ’ला सुवर्णपदक!

३३० स्किटमधून अंतिम फेरीत बाजी; विजेत्या विद्यार्थ्यांचा एमआयटीएममध्ये सत्कार

सिंधुदुर्गनगरी : सुकळवाड येथील एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सव २०२६ मध्ये सांस्कृतिक क्षेत्रात दमदार कामगिरी करत ‘चौथा स्तंभ’ या स्किटसाठी सुवर्णपदक पटकावले. तब्बल १२ झोनमधून सादर झालेल्या ३३० स्किटमधून एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज आणि बेडेकर कॉलेजच्या स्किटची अंतिम निवड झाली. त्यातून एमआयटीएमच्या ‘चौथा स्तंभ’ने गोल्ड मेडलवर मोहोर उमटवत सिंधुदुर्गच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
      या उल्लेखनीय यशाबद्दल गुरुवारी एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विजेत्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, पुस्तक, वृक्षरोप देऊन या मुलांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी संचालक अशोक सावंत, संचालक केतन कदम, अधिष्ठाता पूनम कदम यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
    विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संचालक अशोक सावंत यांनी आपल्या एमआयटीशी असलेल्या नात्याचा आणि स्वतःच्या विद्यार्थी जीवनातील अनुभवांचा भावनिक संदर्भ दिला. ते म्हणाले, ‘‘एमआयटीशी माझे नाते केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाही. या संस्थेने मला शिकण्याची संधी दिली, माझ्या अडचणी समजून घेतल्या आणि पुढे जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. शिष्यवृत्तीपासून प्रकल्पापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मिळालेल्या सहकार्यामुळे या संस्थेबद्दल माझ्या मनात कायम कृतज्ञता आहे.’’ विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालकांचाही तितकाच वाटा असल्याचे सांगताना सावंत यांनी मेहनत, सातत्य आणि शिस्त या त्रिसूत्रीवर भर दिला. ‘‘आयुष्यात केवळ सहभागी होणे पुरेसे नाही, तर जिंकण्याची जिद्द असली पाहिजे. परिस्थिती सामान्य असली तरी स्वप्ने मोठी ठेवा. अपयशाला घाबरू नका. आई-वडील, शिक्षक आणि संस्थेने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाचे रूपांतर कर्तृत्वात करा. तुम्ही मोठे व्हाल, तेव्हा तुमच्यासोबत एमआयटीचे नावही मोठे होईल,’’ असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
      संचालक केतन कदम यांनी संस्थेच्या उभारणीमागील दूरदृष्टी आणि पूर्वसुरींच्या स्वप्नांचा उल्लेख केला. संस्थेची आजची प्रगती ही त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाला मिळालेले मूर्त स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले. अधिष्ठाता पूनम कदम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कला, क्रीडा, नृत्य, नाट्य आणि संगीताचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
      ३३० स्किटमधून भरारी
     मुंबई येथे झालेल्या युवा महोत्सवात राज्यातील १२ झोनमधून तब्बल ३३० स्किट सादर झाली होती. या मोठ्या स्पर्धेतून एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘चौथा स्तंभ’ या स्किटने आपली वेगळी छाप पाडली. या स्किटचे लेखन व दिग्दर्शन विठ्ठल तळवलकर यांनी केले, तर तेजस मस्के यांनी सहदिग्दर्शन केले. स्किटमध्ये तेजस धुरी, मयुरेश जाधव, गौरव सांडव, पार्थ केळुसकर, पार्थ पालव आणि कृष्णा सुतार यांनी भूमिका साकारल्या. चिन्मय माधव आणि शिवराम गुरव यांनी संगीत साथ दिली. सहाय्यक समन्वयक म्हणून लक्ष्मी सावंत व अनिकेत पालव यांनी काम पाहिले. सांस्कृतिक विभागप्रमुख जानकी पावसकर तसेच कॉलेज युवा महोत्सव समन्वयक सुदेश जामसंडेकर आणि श्वेता मेस्त्री यांचे मार्गदर्शन लाभले.
सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून कणकवली कॉलेजचे डॉ. आशिष नाईक व देवगड कॉलेजचे डॉ. वळंजू, तर जिल्हा सहसमन्वयक म्हणून डॉ. निलेश सावे यांनी जबाबदारी सांभाळली. एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजने अभियांत्रिकी शिक्षणासोबत सांस्कृतिक क्षेत्रातही राज्यस्तरावर मिळवलेले हे यश संस्थेच्या विद्यार्थीकेंद्री वाटचालीचे प्रतीक ठरले आहे.
       ‘यशात संस्थेचाही वाटा’
      ‘‘तुम्ही मिळवलेले प्रत्येक यश केवळ तुमचे नसते. त्यामध्ये आई-वडील, शिक्षक आणि संस्थेचाही वाटा असतो. मोठी स्वप्ने पाहा, मेहनत करा आणि आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहा. तुमच्या यशासोबत एमआयटीचे नावही मोठे झाले पाहिजे.’’
— अशोक सावंत, संचालक, एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज

error: Content is protected !!