ठळक घडामोडी

गोवा, जयपूर, उदयपूर फिरत राहिला; अखेर ताडदेवमध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

कणकवलीतील चोरीचा गुन्हा; तीन वर्षांनी फरार संशयित आरोपी मुंबईतून ताब्यात

सिंधुदुर्ग एलसीबी पथकाची कारवाई; कणकवली पोलिसांकडून तपास सुरू

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
      कणकवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात गेल्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताडदेव, मुंबई येथून शिताफीने ताब्यात घेतले. लीलाधर मोडाराम सुथार (वय ३९, मूळ रा. पिंपासार नागोर, राजस्थान) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
     पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कणकवली पोलिस ठाण्यात १५ जून २०२३ रोजी गुन्हा क्रमांक १७२/२०२३, भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सतीश विजय नाईक (वय ५०, रा. नाथ पै नगर, कणकवली) यांच्या घरी सुमारे वर्षभर काम करणाऱ्या सुथार याने त्यांच्या पत्नीचे सुमारे ३.७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच सुमारे एक लाख रुपये किमतीचे लाकडी प्लायवूड चोरून नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो फरार झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीने आपले अस्तित्व लपवून गोवा, राजस्थानमधील जयपूर, उदयपूर यांसह विविध ठिकाणी वास्तव्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तो ताडदेव, मुंबई परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
     त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व पथकाने मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी आराध्या आवान इमारतीजवळ, भाटिया हॉस्पिटलच्या मागील बाजूस, ताडदेव येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील कार्यवाहीसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
     ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल जॅकसन घोन्सालविस, पोलिस कॉन्स्टेबल अमर कांडर तसेच कणकवली पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल पांडुरंग पांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

error: Content is protected !!