

कुडाळच्या संभाव्य पाणीटंचाईसाठी ३.७७ कोटींचा आराखडा; १०८ वाड्यांचा समावेश
पुढील सात-आठ महिन्यांचे पाणी नियोजन आताच करा; टँकरसाठी स्रोत निश्चित करण्याचे आ.राणेंचे निर्देश
कुडाळ : पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज पाणीटंचाई आढावा बैठक झाली. यावेळी मागील आराखड्यातील मंजूर, पूर्ण व अपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. अपूर्ण कामे का रखडली, याची माहितीही अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. पाणी साठवणूक, गाळ काढणे, विहिरींची दुरुस्ती, बंधारे बांधणी यांसह पाणीटंचाई निवारणाची सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आ. राणे यांनी दिल्या. किती टँकर लागतील, कोणत्या गाव-वाड्यांना त्यांची आवश्यकता भासेल आणि त्यासाठी पाण्याचे स्रोत कोणते असतील, याचे आताच सर्वेक्षण करून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी ३ कोटी ७७ लाख रुपयांचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील सात-आठ महिन्यांचे पाणी नियोजन आतापासूनच करावे, टँकरसाठी पाण्याचे स्रोत निश्चित करावेत आणि आराखड्यातील कामांना तातडीने गती द्यावी. पाणीटंचाईच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर ‘ऑन द स्पॉट’ कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी आमदार निलेश राणे यांनी दिला.
दुष्काळजन्य परिस्थितीत प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता गरजू नागरिकांच्या पाठीशी उभे राहावे. प्रांताधिकारी व तहसीलदारांनी पाणीटंचाई आराखड्यातील कामांचे नियमित मॉनिटरिंग करावे. अधिकारी कामात हलगर्जीपणा करत असल्यास त्यांना मेमो काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मागील वर्षी कुडाळ तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा ५९ लाख रुपयांचा होता. यंदा तो तब्बल ३.७७ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. १०८ वाड्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे व तहसीलदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आराखड्याची व्याप्ती वाढली असून, अधिकाधिक गावांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज आ. राणे यांनी व्यक्त केली.
राज्यातील २६५ तालुके दुष्काळ व्यवस्थापनाच्या ट्रिगर-१ मध्ये आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने जबाबदारीने काम करावे. आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात जास्तीत जास्त मदतीची मागणी शासनाकडे करण्यात येईल, असेही आ. राणे यांनी सांगितले.
बैठकीला पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, उपसभापती सिताराम तेली, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक गवस यांच्यासह जि.प. व पं.स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.









