ठळक घडामोडी

कुणकेश्वरच्या पर्यटनाला ‘ताज’ची झळाळी; ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल साकारणार!

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात झाला करार

सिंधुदुर्गच्या पर्यटनासह रोजगाराच्या संधींना मोठी चालना

सिंधुदुर्ग/मुंबई : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील करार मंगळवारी मंत्रालयातील आपल्या दालनात करण्यात आला. ५० खोल्यांचे हे हॉटेल अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, या प्रकल्पामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
      शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथे ताज हॉटेल साकारत असल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला आणखी मोठी झळाळी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याबरोबरच पर्यटनाशी निगडित व्यवसायांना नव्या संधी उपलब्ध होतील. त्यातून जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नातही वाढ होण्यास हातभार लागेल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
       कुणकेश्वर हे धार्मिक तसेच निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारा, निसर्गसौंदर्य आणि धार्मिक पर्यटनाचा संगम असलेल्या या परिसरात जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची भर पडणार आहे. ‘ट्री ऑफ लाईफ’ या ब्रँडच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या हॉटेलमुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंधुदुर्गला आणखी एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र विकसित होण्यास मदत होणार आहे.
       कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हॉटेल प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी, तर स्थानिक उद्योजक व व्यावसायिकांना पर्यटनपूरक व्यवसाय वाढविण्याची संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. करारावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे उपस्थित होते.

error: Content is protected !!