
सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे विभागीय आयुक्तांकडे निवेदन; पर्यटनाला मिळणार चालना
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ येथील ऐतिहासिक वारसा लाभलेली कोर्टाची विद्यमान वास्तू लवकरच नव्या ठिकाणी स्थलांतरित होणार आहे. ही जागा रिकामी झाल्यानंतर तिचा उपयोग ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून करण्यात यावा, यासाठी ‘सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्ट’ने महत्त्वपूर्ण प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला आहे. या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारे भव्य ‘शंभूचरित्र म्युझियम’ (संग्रहालय) उभारण्यात यावे, अशी मागणी ट्रस्टच्या वतीने कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांच्याकडे करण्यात आली आहे.
कुडाळ कोर्टाची विद्यमान वास्तू व परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वास्तव्याचे दाखले आढळतात. त्यामुळे या ऐतिहासिक जागेवर शंभूराजेंचे जीवनचरित्र, त्यांचा पराक्रम, त्याग आणि स्वराज्य रक्षणाची गाथा सांगणारे संग्रहालय उभारल्यास या वारशाचे जतन होईल, असे ट्रस्टने निवेदनात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने कुडाळच्या मध्यवर्ती ठिकाणी असे संग्रहालय उभारल्यास जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळू शकते. तसेच नव्या पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जवळून अनुभवता येईल. यासाठी शासनाने आवश्यक प्रशासकीय व आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद महादेव शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले असून, या ऐतिहासिक मागणीवर शासन कोणता निर्णय घेते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.








