ठळक घडामोडी

कुडाळ सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोत कचरा टाकायचाच नाही..!

सीईओंची दोन महिन्यांची मुदत नाकारली; नागरिकांचा ‘कचरा टाकू देणार नाही’चा निर्धार

पोलीस प्रशासनालाही निवेदन; आता न.पं.प्रशासन काय करणार?

कुडाळ : प्रतिनिधी
         कुडाळ शहरातील सांगिर्डेवाडी येथील खासगी जागेवरील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत या ठिकाणी कचरा टाकण्यास तीव्र विरोध केला. कचरा डेपो तातडीने बंद करून परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली.
          नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पवळ यांनी डेपोजवळ जाऊन नागरिकांशी चर्चा केली. नगरपंचायतीचा एमआयडीसीमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्णत्वाकडे असून, तो पूर्ण होईपर्यंत आणखी दोन महिने सद्यस्थितीत सहकार्य करावे, अशी विनंती केली. मात्र, खासगी जागेत कचरा टाकण्यास नागरिकांनी स्पष्ट विरोध दर्शविला.
सांगिर्डेवाडीतील अनधिकृत कचरा डेपोमध्ये दुर्गंधी व अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डेपोमधील कचरा उचलून परिसराची पूर्णपणे साफसफाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.
     दरम्यान, नागरिकांनी पोलिस प्रशासनाचीही भेट घेतली. या खासगी जागेत कचरा टाकण्यासाठी नगरपंचायतीला पोलीस संरक्षण देऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी अभय शिरसाट, अमित सामंत, धीरज परब, के. बी. परब, सुरेश राऊळ, नारायण (बाळू) राऊळ, निलेश परब, भूषण राणे, अमित राणे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
       दरम्यान, सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोच्या प्रश्नामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही निर्माण झाला असून, नगरपंचायत प्रशासन यावर कोणता तोडगा काढणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!