

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील स्वप्नवेल पॉईंट, तिलारी कॅनाल परिसरातून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अखेर ४०० फूट खोल दरीत मृतदेह आढळून आला. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगेलीच्या पथकाने तब्बल नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला. मयत तरुणाचे नाव हर्षद प्रकाश हुंदळेकर (रा. पाटणे फाटा, जंगमटी) असे आहे. हर्षद हा पाच दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू पथकाने स्वप्नवेल पॉईंट व परिसरात शोधमोहीम राबवली. अखेर आज दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी त्याचा मृतदेह खोल दरीत आढळून आला.
या बचाव मोहिमेत सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपचे बाबल आल्मेडा, उत्तम नार्वेकर, लॉरेन्स आल्मेडा, अजित नार्वेकर, प्रतीक मोहिते, संतान आल्मेडा, राजू राऊळ, नारायण चव्हाण, मनेश नार्वेकर, अजित गावडे, सर्वेश नाईक, आनंद नार्वेकर, गुरुनाथ सावंत, राकेश गावडे तसेच चंदगड येथील श्रीपाद सामंत, विशाल परब व साई गोसावी यांनी सहभाग घेतला.








