
मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांचे आवाहन
एसआयआर अंतर्गत कुडाळ येथे मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

कुडाळ : प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी काळजीपूर्वक तपासणी करावी. मतदार यादीमध्ये काही त्रुटी, हरकती अथवा सूचना असल्यास त्या विहित प्रक्रियेनुसार आणि निर्धारित मुदतीत निवडणूक यंत्रणेकडे सादर कराव्यात, असे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी सांगितले. नागरिकांनी स्वतःचे व कुटुंबीयांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे की नाही, याची वेळीच खात्री करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
दौऱ्यादरम्यान तहसीलदार कार्यालय, कुडाळ येथे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आज घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील आत्तापर्यंत झालेल्या कामकाजाची संख्यात्मक माहिती सादर केली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष वैभव नाईक (व्ही.सीद्वारे), शिवसेना जिल्हा सचिव तुकाराम साईल, भाजपा प्रदेश सदस्य गुरुनाथ रावुळ, शिवसेनेचे हेमंत कुडाळकर, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख दिपलक्ष्मी पडते उपस्थित होते. प्रशासनातील जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूसे, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील तसेच निवडणूक विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध मतदान केंद्रे, ग्रामपंचायती आणि मतदारसंघातील क्षेत्रीय कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रारूप मतदार यादी व आवश्यक याद्या योग्य पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत की नाही, याची त्यांनी खात्री केली. यावेळी जिल्ह्यात प्रशासनामार्फत सुरू असलेल्या पुनरिक्षण कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
नवीन नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक ६, नाव वगळणी किंवा आक्षेपासाठी नमुना क्रमांक ७ तसेच नाव अथवा पत्त्यातील दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ भरून विहित मुदतीत सादर करता येणार आहे. विशेषतः नवमतदार, पात्र युवक-युवती तसेच अद्याप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांपर्यंत गणपती कालावधीत पोहोचून त्यांची नोंदणी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी नमूद केले. राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनीही मतदान केंद्रनिहाय मतदार यादीचा अभ्यास करून पुनरिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी विविध सूचना व प्रश्न उपस्थित केले, त्यावर रुबल अगरवाल आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मार्गदर्शन केले.










