

श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; १७ दिवसांचा गणेशोत्सव

कुडाळ : प्रतिनिधी
‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आज सोमवारी सकाळी कुडाळ येथे ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. कुडाळ पोस्ट ऑफिस चौकातील महायुती जनसंपर्क कार्यालयासमोरील पटांगणात विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गच्या राजा’च्या दर्शनासाठी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली.
खासदार नारायण राणे, निलम राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून तसेच सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कुडाळमध्ये हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत असून, १७ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. आज सकाळी कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते श्रींचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी ओंकार तेली, आनंद शिरवलकर, विनायक राणे, विनायक घाडी, भूषण राणे, नागेश नेमळेकर, राकेश नेमळेकर, गोट्या कोरगावकर, रेवती राणे, राजेंद्र राणे, विश्वास पांगुळ, शाहनवाज गोधड यांच्यासह सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, विविध राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.









