ठळक घडामोडी

सीसीटीव्हीने दिला सुराग, पोलिसांनी गाठले जालना; सावंतवाडी बसस्थानकातील सोन्याच्या दागिने चोरीचा छडा!

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; संशयित महिला जालना जिल्ह्यातून ताब्यात

सिंधुदुर्ग : सावंतवाडी बसस्थानक येथे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत एका ३५ वर्षीय संशयित महिला आरोपीला जालना जिल्ह्यातील मंठा येथून ताब्यात घेतले. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये २१ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
         गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान पोलिसांनी सावंतवाडी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. या तपासात सदर चोरीच्या गुन्ह्यात रेकॉर्डवरील संशयित महिलेचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने मंठा, जिल्हा जालना येथे जाऊन सापळा रचला. २९ सप्टेंबर रोजी पोलिसांनी शिताफीने संशयित महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपी महिलेला सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले असून, चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्याची कार्यवाही सुरू आहे.
        ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल जॅकसन घोन्सालविस, पोलिस कॉन्स्टेबल अमर कांडर तसेच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश पाटील, हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल गावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

error: Content is protected !!