ठळक घडामोडी

पुष्पसेन सावंत ज्ञानपीठात रोजगार महामेळावा उत्साहात!

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत आयोजन; ६० उमेदवारांचा सहभाग

कुडाळ : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत वाडीहुमरमळा (डिगस) येथील पुष्पसेन सावंत ज्ञानपीठात रोजगार महामेळावा उत्साहात पार पडला. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय तसेच नर्सिंग विद्यालय, वाडीहुमरमळा यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात तब्बल ६० उमेदवारांनी सहभाग नोंदविला.
      मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर राजेंद्र परब, गीता काळे, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका नूतन परब, संचालक राम घोगळे, जि.प. सदस्या सुप्रिया वालावलकर, सीता ढवळे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग लंगुटे, माई नर्सिंग स्कूलचे प्राचार्य ओंकार गरड तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
      कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी राजेंद्र परब आणि गीता काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या रोजगार महाकुंभाच्या मुख्य उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले.
     या रोजगार महामेळाव्यासाठी जन आरोग्य प्रा. लि., सीमकेम प्रा. लि., एफएमसी इंडिया प्रा. लि. आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभागी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. त्यामुळे स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत झाली.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका पवार आणि देवांगी यांनी केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमास उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!