ठळक घडामोडी

कुडाळ हिंदू कॉलनीतील भूखंडप्रकरणी नगरपंचायत आणि महसूल अधिकाऱ्यांना नोटिसा!

सिंधुदुर्ग :  कुडाळ येथील हिंदू कॉलनीतील एका भूखंडप्रकरणी ८४ भूखंडधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे धाव घेऊन दाद मागितली असून, याप्रकरणी कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी कुडाळ नगरपंचायत आणि महसूल अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच कुडाळ तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या ३२ ग प्रमाणपत्राला स्थगिती दिली आहे.
        या भूखंडातील ३७ आर जमिनीवर कुळ असल्याचा दावा हा खोटा असून याप्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी याचिकाधारकांनी न्यायालयाकडे केली आहे. या भूखंडावर महादेव आरेकर यांचा कुळ हक्क घोषित करण्याचा अर्ज कुडाळ तहसीलदार यांनी दोनवेळा नामंजूर केला होता आणि असे असताना तत्कालीन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांनी आरेकर यांचा कुळ हक्काचा दावा मान्य केला असा युक्तिवाद भूखंडधारकांचे वकील अॅड. सतीश तळेकर यांनी केला आहे. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमामधील तरतुदी इथे लागू होत नाहीत असेही युक्तिवादात अॅड. तळेकर यांनी म्हटले आहे. या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने संबंधितांना नोटिसा बजावतानाच कुळ कायदा न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
     याप्रकरणी कुडाळ येथील नगरसेविका संध्या तेरसे यांनी आंदोलन केले होते. त्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडेही धाव घेतली होती. किंबहुना याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत संध्या तेरसे यांनी राजीनामाही दिला होता. आता याबाबत उच्च न्यायालय पुढे काय निर्णय देते याकडे लक्ष लागून राहिला आहे.

error: Content is protected !!