ठळक घडामोडी

कुडाळच्या विकासासाठी मोठा संकल्प; जागतिक दर्जाचे शहर बनविणार : आ. निलेश राणे!

बहुचर्चित गणेश घाट व परिसर सुशोभिकरण कामाचे दिमाखात लोकार्पण

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्री.गणेश म्हाडदळकर यांचा सत्कार करण्यात आला.


कुडाळ : “तुम्ही मला जिंकवलंय, आता माझा मतदारसंघ मला जिंकवायचाय. महाराष्ट्राच्या नकाशावर कुडाळ-मालवण मतदारसंघ मागे राहू नये, ही तळमळ माझ्यामध्ये आहे. मागील दहा वर्षांत जे घडलं नाही, ते घडवण्याचा आपण प्रयत्न करतोय. मला यातून काहीही मिळवायचं नाही, तर या मतदारसंघात मोठमोठी विकासकामे करायची आहेत,” असा निर्धार आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
     कुडाळ नगरपंचायत आणि पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून भंगसाळ नदीकिनारी साकारण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश घाट व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा सोमवारी आ. निलेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना त्यांनी कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला. कुडाळ शहर २१व्या शतकातील जागतिक दर्जाचे सुंदर शहर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असून आगामी काळात शहरात आणखी मोठ्या विकासकामांना गती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
     गणेश घाटाच्या कामाबाबत बोलताना आ. राणे यांनी कामाच्या मंजुरीपासून निविदा, वर्क ऑर्डर आणि भूमिपूजनाच्या तारखांचा उल्लेख करत श्रेयवादावरून विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला. “मी कधीही दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेत नाही. माझे आहे ते पुराव्यासह सांगता आले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
      “जनतेला गृहीत धरू नका. जो काम करेल तोच टिकेल. माझी कोणाशीही स्पर्धा नाही. मला माझा मतदारसंघ जिंकवायचा आहे,” असे सांगत त्यांनी सकारात्मक राजकारणाची गरज व्यक्त केली. विकासकामांमध्ये अडथळे आणणाऱ्या नकारात्मक राजकारणाचा विकासावर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात मच्छिंद्रनाथ कांबळी सभागृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शहरातील मुख्य डीपीआर रस्ता, एसटीपी प्लांट, पाणीपुरवठा प्रकल्प यासह अन्य महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नगरपंचायतीने उर्वरित विकासकामांची यादी तयार करून ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. नगरपंचायतीचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याचे आवाहन करताना, “आपण कुडाळचे मालक नाही, तर सेवक आहोत. लोकांना आवडेल, शहराच्या हिताचे असेल तेच काम करा. कामाच्या दर्जावर कोणताही डाग लागू देऊ नका,” असे आ. राणे यांनी सांगितले.
      यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळ नगरपंचायतीने सुंदर गणेश घाट साकारल्याचे सांगत आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्याचे नमूद केले. जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी गणेश घाटामुळे गणेश विसर्जनाची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच कुडाळच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
      नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी गणेश घाटाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याचे सांगत हा प्रकल्प श्रद्धा, भावना आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा असल्याचे नमूद केले. घाट परिसरात स्वागत कमान, बैठक व्यवस्था, कारंजे व सुशोभीकरण करण्यात आले असून गणेश विसर्जनाच्या काळात सुरक्षा पथकही तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, सभापती मिलिंद नाईक, मुख्याधिकारी खंडू पवळ, प्रसाद रेगे, काका कुडाळकर, संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख तथा जि.प.सदस्य दीपलक्ष्मी पडते, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष पी.डी.शिरसाट, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दिपक नारकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली व विनायक राणे, नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, अॅड.राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, निलेश परब, गणेश भोगटे, आफरीन करोल, अक्षता खटावकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, पर्यटन संचालनालयाचे उपअभियंता ऋषिकेश नारकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, भाजपचे पप्या तवटे, युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, पावशी सरपंच वैशाली पावसकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब व निता राणे, ठेकेदार गणेश म्हाडदळकर आदींसह आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी, न.पं.चे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरीक उपस्थित होते. हा प्रकल्प पूर्ण करणारे ठेकेदार एस.के.पवार व गणेश म्हाडदळकर तसेच पर्यटन संचालनालयाचे उपअभियंता ऋषिकेश नारकर, न.पं.चे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आ.राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत व सत्कार नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर आणि उपनगराध्यक्ष शिंदे यांनी केला. सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.

error: Content is protected !!